बिहारमधील नालंदा येथे शितला देवी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ८ महिलांचा मृत्यू झाला असून १२ हून अधिक जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चैत्र महिन्याचा शेवटचा मंगळवार असल्याने शितला देवीच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. गर्दी अचानक वाढल्याने पुढे जाण्याच्या प्रयत्नात भाविकांमध्ये ढकलाढकली सुरू झाली आणि त्यातून चेंगराचेंगरीची घटना घडली. या गोंधळात अनेक महिला आणि लहान मुले जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले असून मंदिर परिसर तात्पुरता रिकामा करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर मंदिरातील सुरक्षा व्यवस्था आणि गर्दी नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. काही स्थानिकांच्या मते, मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि व्यवस्थापन नसल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला जात आहे. या दुर्घटनेबाबत राज्य प्रशासनाने चौकशी सुरू केली असून नेमकी कारणे काय होती, याचा तपास केला जात आहे.















Discussion about this post