जळगाव । जळगावमध्ये पोलिस दलाला धक्का देणारी घटना समोर आली असून, अवैध वाळू तस्करीशी संबंधित कथित संगनमतामुळे एका हेड कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. रामकृष्ण इंगळे असे संबंधित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे हा प्रकार उघडकीस आला. या व्हिडिओमध्ये वाळू उपशासाठी दरमहा ठराविक रक्कम देण्याबाबत चर्चा होत असल्याचे दिसते. सुरुवातीला ५ हजार रुपये दिल्याची माहिती देण्यात येते, त्यावर ४ हजार रुपये देण्याचे सुचवले जात असल्याचे संभाषणात ऐकू येते. याशिवाय, कोणतीही भीती न बाळगता काम सुरू ठेवण्याचे संकेतही दिल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाची दखल घेत पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तात्काळ चौकशीचे आदेश देत संबंधित हेड कॉन्स्टेबलला निलंबित केले. प्राथमिक तपासातून गिरणा नदी परिसरातील वाळू तस्करीशी संबंधित साखळी पुन्हा चर्चेत आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे जळगाव पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील तपासात आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post