राज्यातील वीज ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून वीज दरात कपात लागू होणार आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि वीज वितरण कंपन्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मासिक खर्चात काही प्रमाणात बचत होण्याची शक्यता आहे.
महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या प्रमुख वीज वितरण कंपन्यांनी घरगुती वीज दर कमी करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केला होता. आयोगाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर १ एप्रिलपासून राज्यभरात नवीन वीज दर लागू करण्यात येणार आहेत. विशेषतः कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना याचा अधिक फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
नव्या दरानुसार, ० ते १०० युनीट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना प्रति युनीट ४.३ रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी या श्रेणीसाठी ४.७६ रुपये दर होता. तसेच १०१ ते ३०० युनीटसाठी ७.१ रुपये, ३०१ ते ५०० युनीटसाठी ११.६४ रुपये आणि ५०० पेक्षा जास्त युनीटसाठी १२.६४ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. या सर्व श्रेणींमध्ये सुमारे ९ ते १४ टक्क्यांपर्यंत दरकपात करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे राज्यातील लाखो वीज ग्राहकांना आर्थिक दिलासा मिळणार असून, घरगुती वीज बिलात घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी काळात वीज वापर वाढत असतानाही कमी दरामुळे ग्राहकांना काही प्रमाणात आर्थिक स्थैर्य मिळेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.















Discussion about this post