जळगाव : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित “चैत्र पालवी स्वरोत्सव” मैफल गुढी पाडव्याच्या निमित्ताने महात्मा गांधी उद्यानात उत्साहात संपन्न झाली. भक्तीगीते, अभंग, नाट्यगीत आणि सुगम संगीताने सजलेल्या या मैफलीने रसिकांना सुरेल आनंदाची पर्वणी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात परंपरेनुसार गुरु वंदनेने झाली. प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी गुरु वंदना सादर केली. महापौर दीपमाला काळे, अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, आमदार राजूमामा भोळे व कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यानंतर गायक वरुण नेवे, श्रुती जोशी तसेच बासरीवादक राजेश्वरी रत्नपारखी यांनी विविध गीतांचे सादरीकरण केले. ओंकार स्वरूपा, आरंभी वंदिन अयोध्येचा राजा, गगन सदन तेजोमय, शून्य गड शहर, देवाघरचे ज्ञात कुणाला, आम्हा नकळे ध्यान, विष्णुमय जग, संत भार पंढरीत, बाजे मुरलिया बाजे, मी राधिका आदी गीतांनी वातावरण भारावून गेले. बासरीवर सादर केलेले ‘मन मंदिरा’ आणि ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा’ यांना विशेष दाद मिळाली. ‘अवघा रंग एक झाला’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.
निवेदिका प्रिती झारे यांनी ओघवत्या आणि अभ्यासपूर्ण शैलीत कार्यक्रमाचे निवेदन केले. आभार प्रदर्शन नुपुर खटावकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्निग्धा कुलकर्णी तसेच भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन यांचे सहकार्य लाभले.















Discussion about this post