नवी दिल्ली । मध्यपूर्वेतील युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन संकटाचा परिणाम आता भारतात स्पष्टपणे दिसू लागला आहे. देशातील अनेक भागांत एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना सिलेंडरसाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही परिस्थिती अधिक गंभीर झाली असून, गॅस मिळेल की नाही याबाबत ग्राहकांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे.
सरकारकडून गॅसचा तुटवडा नसल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात अनेक शहरांमध्ये गॅस एजन्सीबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. पुरवठा सुरळीत करण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात आले, मात्र त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला नाही.
या पार्श्वभूमीवर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (BPCL) एक नवा पर्याय समोर आणला आहे. गुरुग्राममधील सेक्टर-33, सोहना परिसरात देशातील पहिले एलपीजी एटीएम सुरू करण्यात आले आहे. या यंत्रणेद्वारे ग्राहकांना रिकामे कंम्पोझिट सिलेंडर थेट मशीनमधून काही मिनिटांत भरून घेता येणार आहे.
हे एटीएम 24 तास सुरू राहणार असून, ग्राहकांना मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करून ओटीपीच्या सहाय्याने व्यवहार पूर्ण करता येईल. यासाठी UPI तसेच क्रेडिट-डेबिट कार्डचा वापरही करता येणार आहे.
या पथदर्शी प्रकल्पामुळे गॅस वितरणातील अडचणी काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी काळात देशातील इतर शहरांमध्येही अशी सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे.















Discussion about this post