मुंबई : नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसच सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा झटका बसणार आहे. 1 एप्रिलपासून अनेक वस्तूंच्या किंमती वाढणार असून, मोठ्या खरेदीसाठी आता फक्त मार्च अखेरपर्यंतच संधी उरली आहे.
उत्पादन खर्चात झालेली वाढ, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मालवाहतुकीचे वाढलेले दर आणि रुपयाच्या घसरणीमुळे कंपन्यांनी दरवाढीचा निर्णय घेतला आहे. विशेषतः प्लास्टिक, रेझिन आणि पॉलिमर यांसारख्या कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याने उत्पादन महाग झाले आहे.
याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे. कार आणि दुचाकींच्या किंमतीत २ ते ३ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. तर एसी, फ्रिजसारख्या घरगुती उपकरणांच्या दरात ५ ते ६ टक्क्यांची वाढ होऊ शकते. याशिवाय शूज, सिंथेटिक कपडे आणि घरगुती रंगसामान ९ ते १० टक्क्यांनी महाग होण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या मते, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरल्याने आयात होणाऱ्या वस्तूंचा खर्च वाढला आहे, ज्याचा परिणाम थेट बाजारभावावर होत आहे. त्यामुळे आगामी काळात महागाईचा दबाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ग्राहकांनी जर मोठी खरेदी करण्याचा विचार केला असेल, तर ३१ मार्चपूर्वी ती पूर्ण केल्यास हजारो रुपयांची बचत होऊ शकते. एप्रिलपासून महागाईची नवी लाट येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.















Discussion about this post