जळगाव । जळगाव जिल्हा परिषद मध्ये अनुकंपा तत्वावर प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांनी ‘गट क’ भरती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, जिल्हा परिषद जळगावमध्ये अनुकंपाधारक उमेदवार गेल्या ७ ते ८ वर्षांपासून ‘गट क’ पदांसाठी प्रतीक्षा यादीत आहेत. शासनाच्या माध्यमातून अनुकंपा तत्वावर भरती करण्याबाबत निर्णय असूनही अद्याप गट ‘क’ पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही.
मागील वर्षी जिल्हा परिषद जळगाव येथे ९८ जणांना ‘गट ड’ पदांवर नोकरी देण्यात आली. मात्र गट ‘क’ प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात आलेली नसल्याने उमेदवारांमध्ये नाराजी आहे. ३१ जुलै २०२५ च्या शासन निर्णयानुसार सुधारित अनुकंपा नियुक्ती धोरणानुसार गट ‘क’ पदांवर सुमारे २० टक्के भरती अपेक्षित आहे. मात्र अद्यापही गट ‘क’ पदांवर भरती केली जात नसल्याने अनुकंपाधारक उमेदवार प्रतीक्षेत आहे. दरम्यान, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची संख्या मोठी असून अनेकांचे अर्ज २०१८ पासून प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अनुकंपाधारक उमेदवारांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, जळगाव जिल्हा परिषदेचे ९७ उमेदवार हे ‘गट क’ च्या प्रतिक्षा यादीमध्ये असून भरती प्रक्रियासंदर्भात अनुकंपाधारकांनी थेट मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मुख्य सचिव ग्राम विकास व पंचायत राज विभाग यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. यामुळे या प्रकरणी सकारात्मक व तातडीचा निर्णय घेऊन गट ‘क’ पदांची भरती प्रक्रिया सुरू करावी आणि वर्षानुवर्षे प्रतीक्षेत असलेल्या अनुकंपाधारक उमेदवारांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.















Discussion about this post