जळगाव । अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने जळगाव जिल्ह्यासाठी सुमारे १५ कोटी ७७ लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तात्काळ शासन निर्णय काढण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव‑पाटील यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीचा प्रश्न आमदार अमोल जावळे यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.
मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना मदत देताना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) च्या निकषांनुसार मदत दिली जाते. मात्र विशेष बाब म्हणून नुकसानभरपाईची २ हेक्टरची मर्यादा वाढवून ३ हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे.
तसेच पूर किंवा पाण्याखाली गेलेल्या शेतीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदस्यांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत अहवाल मागवून संबंधित प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यात २०२२-२३ व २०२३-२४ या कालावधीत शेतकऱ्यांना सुमारे ५ हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. याशिवाय खरीप हंगामात राज्यातील १ कोटी २ लाख शेतकऱ्यांच्या ७९ लाख ८३ हजार ५८१ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीसाठी सुमारे १५ हजार ८१७ कोटी रुपयांची मदत देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.















Discussion about this post