ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सध्या जगभर वाढत असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक वातावरण तणावपूर्ण झाले असून या परिस्थितीत भारताने शांततेचा मार्ग पुढे नेण्यासाठी भूमिका घ्यावी, अशी विनंती केली आहे.
पत्रामध्ये अण्णा हजारे यांनी युद्धामुळे निरपराध नागरिकांवर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधले आहे. संघर्षाच्या परिस्थितीत सर्वाधिक फटका हा सामान्य लोकांना बसतो. विशेषतः महिला, मुले आणि कुटुंबांवर होणारे परिणाम अत्यंत वेदनादायक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
भारताची परंपरा ही अहिंसा आणि शांततेच्या मूल्यांवर आधारित असल्याचे सांगत, भारताने नेहमीच जगाला संवाद आणि सहकार्याचा मार्ग दाखवला आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे सध्याच्या संवेदनशील काळात भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशाकडून मानवतेचा आणि शांततेचा संदेश जगाला जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युद्धातून केवळ विनाश आणि अस्थिरता निर्माण होते, तर संवाद आणि समन्वयातूनच टिकाऊ समाधानाचा मार्ग निघतो, असे अण्णा हजारे यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे भारताने तटस्थ आणि जबाबदार भूमिका घेत जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर सकारात्मक भूमिका बजावली आहे. त्यामुळे या संवेदनशील काळात भारताने मानवता आणि शांततेच्या बाजूने उभे राहणे हे जगासाठी प्रेरणादायी ठरेल, असेही अण्णा हजारे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.















Discussion about this post