नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना अंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. सध्या शेतकरी २२ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असून लवकरच हा हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मागील काही दिवसांपासून हा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा होळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र फेब्रुवारी महिना संपल्यानंतर आणि होळीचा सणही पार पडल्यावरही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

मीडिया अहवालांनुसार, १३ मार्च रोजी हा हप्ता जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आसाम दौरा नियोजित असून त्याच वेळी २२ व्या हप्त्याची घोषणा होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दरम्यान, काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही किंवा फार्मर आयडी तयार केलेला नाही, अशा लाभार्थ्यांचे पैसे रोखले जाऊ शकतात. तसेच एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तींना या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास त्यांनाही हप्ता मिळणार नाही.
याशिवाय कुटुंबातील एखादी व्यक्ती शासकीय नोकरीत असल्यास किंवा एखाद्या लाभार्थ्याला १० हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळत असल्यास त्या शेतकऱ्यालाही या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे आणि केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post