राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील ४ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात रामदास आठवले, विनोद तावडे, माया चिंतामण ईवनाते आणि रामराव वडकुते यांना भाजपने राज्यसभेसाठी संधी दिली आहे. रामदास आठवले यांना भाजपने राज्यसभेसाठी पुन्हा संधी दिली आहे. अनेक दिग्गज नेत्यांच्या पत्ता कट करत भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातल्या ७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यामधील महायुतीकडे ६ जागा आणि महाविकास आघाडीकडे १ जागा असणार आहे. महायुतीमधील ६ पैकी ४ जागा भाजपकडे १ जागा शिंदेसेनेकडे आणि १ जागा राष्ट्रवादीकडे आहे. भाजपने आज ४ जागांच्या उमेदवारांची नावं जाहीर केली. रामदास आठवले, विनाोद तावडे, माया ईवनाते आणि रामराव वडकुते यांना भाजपने संधी दिली. तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवारांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. शिंदेसेनेचा उमेदवार अद्याप ठरला नाही.
भाजपकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी १० जणांची नावं चर्चेत होती. राज्यसभेच्या ४ जागांसाठी कुणाला संधी द्यायची यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांवर बैठका झाल्या. भाजपकडून राज्यसभेसाठी विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील आणि भागवत कराड यांच्यासह काही नेत्यांची नावं चर्चेत होती. पण भाजपने काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली. भाजपने रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील आणि भागवत कराड या दिग्गज नेत्यांचा पत्ता कट केला.
कधी होणार मतदान?
राज्यसभेच्या ३७ जागांसाठी येत्या १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेच्या या निवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला नोटिफिकेशन जारी करण्यात आले होते. ५ मार्च हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. ६ मार्चला अर्जांची छाननी होणार आहे. ९ मार्चपर्यंत उमेदवार अर्ज मागे घेऊ शकतात. त्यानंतर १६ मार्चला सकाळी ९ वाजल्यापासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. सायंकाळी ५ वाजता मतमोजणी सुरू होईल आणि २० मार्चपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.















Discussion about this post