मुंबई । राज्यातील महापालिका, झेडपीनंतर आता सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. न्यायालयानं स्थगिती दिलेल्या सहकारी संस्था वगळून उर्वरित ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्या सर्व संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं उठवली आहे. त्यामुळं राज्यातील ११ हजार ४१ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्राधिकरणानं नेमकं काय म्हटलंय?
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं काढलेल्या आदेशानुसार, अ व ब वर्गातील सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम ज्या टप्प्यावर स्थगिती देण्यात आली होती, तिथूनच पुढे या निवडणुका नियमातील तरतुदींप्रमाणं घेण्यात यावी. यासाठीचा प्रस्ताव संबंधित सहकारी संस्थांनी मान्यतेसाठी प्राधिकरणाकडं पाठवावा.
तसंच अ, ब, क, ड या वर्गातील सहकारी संस्थांनी निवडणुकीसाठीच्या तात्पुरत्या मतदार याद्या तयार कराव्यात त्यासाठी १ फेब्रुवारी २०२६ हा कट ऑफ दिनांक देण्यात आला आहे. म्हणजेच या तारखेपर्यंतच्या मतदार याद्या ग्राह्य धरल्या जातील. या वर्षी ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्यांच्यासाठी २४ फेब्रुवारी २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे.
यामध्ये सहकारी संस्थांच्या वर्गनिहाय निवडणुकांमध्ये ७४ ‘अ’ वर्ग सहकारी संस्था, १,३३३ ‘ब’ वर्ग सहकारी संस्था, ३,९४१ ‘क’ वर्ग सहकारी संस्था, ५,६९३ ‘ड’ वर्ग सहकारी संस्थांचा समावेश आहे. या सर्व मिळून ११,०४१ इतक्या सहकारी सस्थांच्या निवडणुका आता होणार आहेत.















Discussion about this post