मुंबई । राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष (भाजप) महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांची नावं ठरली असल्याची माहिती समोर आली असून मंगळवारी रात्री ‘वर्षा’ बंगल्यावर झालेल्या भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत १० ते १२ जणांच्या नावावर चर्चा करण्यात आली. रामदास आठवले यांच्यासह अनेक नेत्यांची नावं फायनल करण्यात आली आहेत. ही नावं दिल्लीला पाठवण्यात आली आहेत.
भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मंगळवारी रात्री पार पडली. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे तसेच आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीमध्ये अनेक नेत्यांच्या नावांवर चर्चा झाली. राज्यसभेसाठी विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, प्रितम मुंडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील आणि भागवत कराड यांच्यासह इतर नावांची चर्चा होत आहे. कोअर कमिटीच्या नावांचा प्रस्ताव दिल्लीत चर्चेला जाणार आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन यांची भेट घेऊन या नावांची चर्चा करतील. त्यानंतर नावांवर शिक्कामोर्तब केला जाईल. २८ फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेची नावे जाहीर केली जाणार आहेत.
रामदास आठवले यांची टर्म संपत आहे. त्यामुळे रामदास आठवले यांना मित्रपक्ष म्हणून भाजप्या कोट्यातून संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे प्रीतम मुंडे यांच्या जागेवर मागच्या वेळी पंकजा मुंडे या निवडणूक लढल्या होत्या. त्यामुळे प्रीतम मुंडे यांना राज्यसभेची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भागवत कराड यांची देखील टर्म संपत आहे त्यामुळे त्यांना देखील पुन्हा संधी देतात का हे पाहणे महत्वाचे ठरते.
धैर्यशील पाटील, रावसाहेब दानवे यांचा देखील लोकसभा नि़वडणुकीवेळी पराभव झाला होता. त्यांची नावं देखील राज्यसभेसाठी चर्चेत आहेत. १० ते १२ नावांवर भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. आता रवींद्र चव्हाण दिल्लीत जाऊन राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेऊन चर्चा करतील. त्यानंतर नावं फायनल केली जातील.















Discussion about this post