मुंबई : महागाईच्या पार्श्वभूमीवर मोबाईल ग्राहकांना आणखी एक आर्थिक झटका बसण्याची शक्यता आहे. देशातील प्रमुख दूरसंचार कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया (Vi) येत्या काही महिन्यांत त्यांच्या मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या दरात १२ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मासिक आणि वार्षिक रिचार्जचा खर्च वाढण्याची शक्यता आहे.
‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, दूरसंचार कंपन्यांचा प्रति ग्राहक सरासरी महसूल (ARPU) वाढवणे आणि 5जी नेटवर्कमध्ये करण्यात आलेल्या मोठ्या गुंतवणुकीची भरपाई करणे हा या संभाव्य दरवाढीमागील प्रमुख उद्देश आहे. गेल्या वर्षी झालेल्या दरवाढीनंतर आता पुन्हा ग्राहकांच्या खिशावर ताण येण्याची चिन्हे आहेत.
सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चच्या आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीसाठीच्या ‘टेलिकॉम अँड इंटरनेट सेक्टर प्रिव्ह्यू रिपोर्ट’मध्ये पुढील तीन ते चार महिन्यांत १२ ते १५ टक्क्यांची दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बाजारातील स्पर्धा कमी होणे आणि दूरसंचार क्षेत्रातील स्थिरता यामुळे कंपन्यांना दरवाढीसाठी पोषक वातावरण मिळाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अहवालानुसार, २जी ग्राहकांचे ४जी आणि ५जी सेवांकडे होणारे स्थलांतर, पोस्टपेड ग्राहकांची वाढ आणि डेटा वापरात सातत्याने होत असलेली वाढ यामुळे कंपन्यांच्या महसुलात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. जून तिमाहीत खासगी दूरसंचार कंपन्यांचा प्रति ग्राहक सरासरी महसूलही वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ग्राहकसंख्येच्या बाबतीतही रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल आघाडीवर राहण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, जिओ सुमारे ७० लाख, एअरटेल ५० लाख, तर व्होडाफोन आयडिया सुमारे २ लाख नवीन ग्राहक जोडू शकते.
देशभरात ५जी सेवेचा विस्तार वेगाने होत असून जिओ आणि एअरटेलने ९० टक्क्यांहून अधिक जिल्ह्यांमध्ये ५जी सेवा उपलब्ध करून दिली आहे. तसेच फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस (FWA) आणि ब्रॉडबँड सेवांमध्येही दोन्ही कंपन्यांची वाढ कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दरवाढीबाबत कंपन्यांकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी अहवालातील अंदाज खरे ठरल्यास येत्या काही महिन्यांत मोबाईल रिचार्जसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात.















Discussion about this post