जळगाव । क्षुल्लक वादावरून झालेल्या मारहाणीत डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात रात्री घडली. सागर अरुण बिऱ्हाडे (वय ३२) असं मयत तरुणाचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आव्हाणे येथील जुन्या मारुती मंदिर परिसरात गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सागर बिऱ्हाडे आणि एका संशयित व्यक्तीमध्ये कोणत्यातरी कारणावरून शाब्दिक चकमक झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपीने सागरला जोराने ढकलून दिले. या धक्क्यामुळे सागर जमिनीवर कोसळला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
सागरला ग्रामस्थांनी तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवले. मात्र, गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मृत सागर बिऱ्हाडे हा कुटुंबातील कर्ता पुरुष होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि तीन लहान मुले असा परिवार आहे. जळगाव तालुका पोलीस सध्या फरार आरोपीचा शोध घेत आहेत. तालुका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.















Discussion about this post