राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नोकरदार वर्गासाठी महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी सर्व नोकरदार कर्मचाऱ्यांना ‘भरपगारी सुट्टी’ देण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे. या निर्णयामुळे मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढावा, हा मुख्य उद्देश आहे.
लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या निवडणुकांमध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग असावा, या उद्देशाने राज्य सरकारने एक मोठा पाऊल उचलले आहे. आगामी 15 जानेवारी 2026 रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत. या दिवशी सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्य सरकारने अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे.
ही सुट्टी सर्व सरकारी कार्यालये, निमसरकारी संस्था, व्यापारी प्रतिष्ठाने, बँका आणि खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना लागू असेल. लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 च्या कलम 135 (ब) नुसार, मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार नाही.
जळगावसह मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई यांसह राज्यातील सर्व 29 महानगरपालिका क्षेत्रांतील मतदारांना ही सवलत मिळेल. ज्या ठिकाणी पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नाही अशा ठिकाणी किमान 2 ते 3 तासांची सवलत देणे बंधनकारक असेल.















Discussion about this post