मुंबई । राज्यातील महायुती सरकारच्या महत्त्वांकाक्षी लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरीत करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याची माहिती समोर आली आहे. या वेळेस 410.30 कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागाकडून घेऊन सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे आता सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्य सरकारनं जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. तेव्हापासून म्हणजेच जुलै 2024 ते ऑगस्ट 2025 पर्यंत 14 हप्त्यांची रक्कम लाडक्या बहिणींना मिळाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आले होते. आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागले होते.
आता सरकारने सप्टेंबरच्या महिन्याच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याने कोणत्याही क्षणी 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतात. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर केला आहे. या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी विभागाअंतर्गत 3960 कोटी इतका नितव्यय मंजूर करण्यात आला आहे.
सामाजिक न्याय विभागाकडे संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना आणि दिव्यांग कल्याण योजना अशा महत्त्वाच्या कल्याणकारी योजना आहेत. मात्र, या योजनांवरील काही निधी आता लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आला आहे. त्यामुळे या योजनांसाठी हात आखडता घ्यावा लागणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत की, उपलब्ध निधीचा वापर करताना अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांना प्राधान्य द्यावे.















Discussion about this post