चाळीसगाव । चाळीसगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने अमरावती-पुणे दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर केला आहे. यामुळे परिसरातील रेल्वे प्रवाशांची सोय होणार आहे.
मध्य रेल्वेने दिवाळी आणि छठ पुजेचे निमित्त साधून प्रवाशांच्या सोयीसाठी विविध ठिकाणांवरून एकूण ९४४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. या गाड्यांव्यतिरिक्त प्रशासनाकडून आणखी १८२ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यात अमरावती-पुणे दरम्यान चालविण्यात येणारी विशेष रेल्वे गाडी जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी जास्त सोयीची ठरणार आहे. ०१४०३ साप्ताहिक विशेष गाडी सात ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक मंगळवारी पुणे येथून १९.५५ वाजता सुटेल आणि अमरावती येथे दुसऱ्या दिवशी १०.०५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण आठ फेऱ्या होतील.
याशिवाय, ०१४०४ साप्ताहिक विशेष गाडी आठ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक बुधवारी अमरावती येथून १२.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ००.१५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या सुद्धा आठ फेऱ्या होतील. या गाडीला जळगाव आणि भुसावळ या महत्वाच्या स्थानकांसोबत चाळीसगाव येथेही दोन्ही बाजुने थांबा देण्यात आला आहे. चाळीसगाव शहर व तालुका तसेच लगतच्या धुळे जिल्ह्याचे नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, कामगार आणि शेतकरी वर्गाला त्याचा लाभ दिवाळी सणाच्या काळात होऊ शकणार आहे.
पैकी, चाळीसगाव स्थानकावर ०१४०३ पुणे–अमरावती विशेष एक्स्प्रेस सकाळी ०४.२८ वाजता येईल आणि -४.३० वाजता रवाना होईल. याशिवाय, ०१४०४ अमरावती–पुणे विशेष एक्स्प्रेस सायंकाळी ०५.१३ वाजता येईल आणि ०५.१५ वाजता रवाना होईल. पुणे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी विशेष गाडीला दोन्ही बाजुने चाळीसगाव येथे थांबा देण्यात यावा म्हणून जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनी पाठपुरावा केला होता. चाळीसगावकरांची ही जुनी मागणी होती. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, नोकरदारांना नोकरीसाठी तसेच व्यावसायिक व व्यापाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कामासाठी ही गाडी सोयीची ठरेल. विशेष म्हणजे नागरिकांचा वेळ, पैसा आणि त्रास वाचू शकणार आहे, असे खासदार वाघ यांनी सांगितले.















Discussion about this post