जळगाव । नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) पश्चिम राजस्थानमधून परतीच्या प्रवासाला सुरूवात केली आहे. राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं दिसून आले. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेती पिके पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हतबल झाला आहे. दरम्यान आज (ता. २०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडीपीसह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
उत्तर अंदमान समुद्रात म्यानमारच्या किनाऱ्यालगत सोमवारपर्यंत (ता. २२) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे २५ सप्टेंबरपर्यंत हवेचा कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. वरील चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. दक्षिण उत्तर प्रदेशापासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे.कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे अतिवृष्टीची नोंद होत आहे.
कोणत्या जिल्ह्याला अलर्ट?
राज्यात विंजासह वादळी पावसाला पोषक हवामान असल्याने, आज (ता. २०) नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाचा अंदाज आहे















Discussion about this post