चोपडा । देशभरात फसवणुकीच्या घटना प्रचंड वाढल्या असून नागरिकांना विविध प्रकारचे आमिष दाखवून गंडविले जात आहे. अशातच चोपडामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यात ग्राहकांकडून हप्त्यांचे पैसे घेऊन कार्यालयात जमा न करता तब्बल ११ लाख ५२ हजार ५३९ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी फायनान्स कंपनीच्या 3 कर्मचाऱ्यांवर चोपडा शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकार?
भारत फायनान्सशियल इन्क्लूजन लिमीटेड चोपडा शाखेत कैलास भागचंद राठोड (वय २६ वर्ष, गणेशनगर खडकी ता. एरंडोल), कल्पेश संतोष पाटील ( वय २५ वर्ष रा. भालगाव ता .एरंडोल), दिगंबर अभिमान खिल्ले (वय-२८ वर्ष रा. अनफवाडी पोस्ट आर्षी ता. जि धुळे) या तिघांनी संगनमत करुन अपहार केला आहे. त्यांच्याकडे फिल्डवर जाऊन कर्जदार ग्राहकांकडून हप्त्याचे पैसे गोळा करुन शाखेत रोखपालाकडे जमा करण्याचे काम होते. मात्र, या तिघांनी दि. ६ जानेवारी २०२३ ते २३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ग्राहकांकडून हप्ते घेऊन त्याचा शाखेत भरणाच केला नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
यात कैलास भागचंद राठोड याने २१ ग्राहकांची हप्त्याची रक्कम ७ लाख ३४ हजार ३०४ रुपये तसेच कल्पेश संतोष पाटील याने १४ ग्राहकांची हप्त्याची रक्कम २ लाख ७९ हजार ७३२ रुपये, दिगंबर अभिमान खिल्ले याने १४ ग्राहकांची १ लाख ३८ हजार ५०३ रुपये अशी ग्राहकांकडुन एकूण ११ लाख ५२ हजार ५३९ रुपयांची हप्त्याची रक्कम बँकेच्या कार्यालयात न जमा करता संगनमत करुन अपहार केला आहे.
ही रक्कम स्वतः जवळ ठेवून त्या रकमेचा आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी वापर केल्याचे दिसून आले आहे. बँकेची तसेच कर्जदार (ग्राहक) यांचा विश्वास संपादन करून फसवणूक केल्याप्रकरणी शनिमंदिर चौकातील भारत फायनान्स इंडसइंड बँकचे व्यवस्थापक वासुदेव कैलास पाटील यांनी तिघांविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चोपडा पोलिस निरीक्षक मधुकर सावळे यांचा मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अनिल रघुनाथ भुसारे करत आहे.















Discussion about this post