मुंबई । मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे सध्या उकाडा आणि उन्हाचा ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, दक्षिण ओडिशाच्या व आंध्र प्रदेशच्या उत्तरेकडील बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते पुढील दोन दिवसांत पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. परिणामी महाराष्ट्रात आज शनिवार ते सोमवार या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, गेले काही दिवस पावसाने उघडीप दिल्याने तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. मध्येच ढगाळ वातावरण तर मध्येच ऊन अशा वातावरणाला सध्या नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पाऊस पडल्यास काहीसा दिलासा मिळेल. मागील तीन दिवसांत राज्यात कमाल तापमानात वाढ दिसून आली. त्या तुलनेत शुक्रवारी तापमानात फारशी वाढ झालेली नाही.
हवामान खात्यानं आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार, रविवारी मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत काही भागात सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर घाट परिसर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, जालना या जिल्ह्यात शनिवारपासून पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.















Discussion about this post