जळगाव – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या राज्यस्तरीय नाट्यपरिषद करंडक एकांकिका स्पर्धेच्या जळगाव जिल्हा केंद्रावरील प्राथमिक फेरीत नाट्यरंग थिएटरने सादर केलेल्या ‘गाईड’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यामुळे नाट्यरंगला मुंबई येथे होणाऱ्या महाअंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे.
‘गाईड’ एकांकिका ही पंढरपूरच्या वारीवर आधारित आहे. विठ्ठलभक्तीचा आनंद शोधण्यासाठी आलेल्या नास्तिक प्राध्यापकाची मंदिराबाहेरील फुलहार विकणाऱ्या माऊली या मुलाशी झालेली भेट ही कथा रंगभूमीवर साकारण्यात आली. माऊली त्याला भक्ती, अध्यात्म आणि वारीचे सांस्कृतिक महत्त्व सांगत अखेर विठ्ठलाच्या गाभाऱ्यापर्यंत घेऊन जातो. संहितेचे लेखन व दिग्दर्शन अमोल ठाकूर यांनी केले होते.
कलावंत सुहास दुसाने आणि अथर्व रंधे यांच्या अभिनयाने अध्यात्म व श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव प्रेक्षकांना दिला. पार्श्वसंगीत पियुष भुक्तार यांचे, रंगभूषा-वेशभूषा दिशा ठाकूर यांची, तर रंगमंच व्यवस्था सुयोग राऊत आणि दर्शन गुजराथी यांची होती.
या एकांकिकेचे परीक्षण पियुष नाशिककर आणि उमेश घळसासी यांनी केले. त्यांनी आशय, भक्तीभाव व सादरीकरणाचे कौतुक करत *‘गाईड’*ला विजेतेपद बहाल केले.
नाट्यरंगच्या या यशाबद्दल नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष ॲड. संजय राणे, शंभू पाटील, प्रमुख कार्यवाह ॲड. पद्मनाभ देशपांडे, सहकार्यवाह योगेश शुक्ल, केंद्रप्रमुख तथा नियामक मंडळ सदस्या गीतांजली ठाकरे आणि सहसमन्वयक पवन खंबायत यांनी अभिनंदन करून महाअंतिम फेरीस शुभेच्छा दिल्या.















Discussion about this post