पाचोरा । ज्या स्कूलबसमधून मुलगी शाळेत जात होती, त्याच स्कूलबसवरील चालकाने एका दहावीच्या विद्यार्थिनीला धमकी देत एका शेतात नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातून समोर आलीय. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.आबिद हुसेन शेख जलील असं अटक केलेल्या ३८ वर्षीय आरोपीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी पाचोरा तालुक्यातील एका खासगी शाळेत शिक्षण घेते. आरोपी आबिद हा देखील याच शाळेत स्कूल बस चालक म्हणून काम करतो. आरोपीनं पीडित मुलीला एका शेतात घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
खरं तर दोन दिवसांपूर्वी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पीडितेचा जबाब घेतला असता हा केवळ विनयभंग नव्हे तर लैंगिक अत्याचाराचं प्रकरण असल्याचं समोर आलं. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्कूल बसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.















Discussion about this post