जळगाव । जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वरखेडे शिवारात शेताला लावलेल्या कुंपणाचा धक्का लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये दोन महिला, एक पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. दरम्यान याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वरखेडे येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतीत वन्य प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेताभोवती तारेचे कुंपण घालून त्यात वीज प्रवाह सोडला होता. मजुरांना या वीज प्रवाहाची कल्पना नव्हती, त्यामुळे त्यांना त्या तारेच्या कुंपणाचा स्पर्श झाला आणि विजेच्या जोरदार धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
शेतकरी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना करतात, मात्र अशा बेकायदेशीर आणि जीवघेण्या उपायांमुळे निष्पाप लोकांचा जीव जात असल्याच्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. या घटनेमुळे शेतात अशा प्रकारे वीज प्रवाह सोडणे किती धोकादायक आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित शेतकऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, पुढील कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.















Discussion about this post