नवी दिल्ली । खासगी वाहनांसाठी फास्टटॅग वार्षिक पास सुरू करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. वार्षिक पासमुळे टोल प्लाझावर टॅक्स भरण्याची कटकट दूर होणार आहे. येत्या 15 ऑगस्ट 2025 पासून हा नियम लागू होईल. फास्टटॅग वार्षिक पासचे मुल्य 3000 रुपये असेल.
वार्षिक पास देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर कार्यक्षम आणि किफायतशीर प्रवासाची सोय करेल, असे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, फास्टटॅग वार्षिक पास फक्त खासगी वाहनांसाठीच तयार करण्यात आला आहे. ज्यात कार, जीप आणि व्हॅन यांचा समावेश आहे. हा पास अॅक्टिव्हेशननंतर एक वर्षासाठी किंवा 200 ट्रिपपर्यंत वैध राहील, यापैकी जी अट आधी पूर्ण होईल तोपर्यंत पासची मुदत असेल.
कोणाला फायदा होणार?
या नव्या पासचा मुख्य उद्देश टोल प्लाझावरील अडचणी कमी करणे हा आहे. विशेषतः, जे लोक टोल प्लाझाच्या 60 किलोमीटरच्या परिसरात राहतात, त्यांच्यासाठी हा पास अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. अनेकदा असे होते की, टोल प्लाझाच्या आसपास राहणाऱ्यांनाही टोल भरावा लागतो. ज्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. या पासमुळे त्यांना मोठा दिलासा मिळेल.
सध्या, जे लोक एखाद्या विशिष्ट टोल प्लाझातून वारंवार प्रवास करतात. ते पत्त्याचा पुरावा आणि आवश्यक कागदपत्रे जमा करून मासिक पास बनवू शकतात. या मासिक पासची किंमत 340 रुपये प्रति महिना असते, जी वर्षाला 4,080 रुपये होते. या तुलनेत3000 रुपयांचा वार्षिक पास आर्थिकदृष्ट्या अधिक परवडणारा ठरणार आहे.















Discussion about this post