जळगाव । राज्यात पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटला नसून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार याकडे लक्ष लागले आहे. यातच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पालकमंत्रीपदाची घोषणा होण्यापूर्वीच स्वत:ला जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून घोषित केले आहे. नुकत्याच एका भाषणात त्यांनी स्वतःच स्वतःला पालकमंत्री म्हणून संबोधित केले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरुन महायुतीत रस्सीखेच सुरु असताना नुकतंच गुलाबराव पाटील यांनी जोरदार भाषण केले. जळगाव तालुक्यातील वावदडा गावातील विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमला ते उपस्थितीत होते. या प्रसंगी गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली. या भाषणात त्यांनी पालकमंत्री काय असतो ते दाखवून देणार, असा सज्जड दम भरला आहे.
कार्यकर्त्यांकडे जर वाकड्या नजरेने बघितलं तर…
“सरकार काठावर येईल असं सर्वांना वाटलं होतं. मात्र बंपर बहुमत मिळालं. 237 जागा निवडून आल्या. लाडक्या बहिणींनी असा करंट मारला की त्यांचे सावत्र भाऊ डायरेक्ट ठार झाले. कोणत्याही नेत्याचा राजकारण हे कार्यकर्त्यांच्या भरोशावर होतं. ज्या नेत्याकडे चांगले कार्यकर्ते आहेत, तो नेता श्रीमंत असतो असं म्हणतात. मी आतापर्यंत मंत्रीपद दाखवलं नाही. पण माझ्या कार्यकर्त्यांकडे जर वाकड्या नजरेने बघितलं तर मग पालकमंत्री काय असतं ते दाखवून देणार,” असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. मात्र नियुक्ती झालेली नसताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणात स्वतःच स्वतःला पालकमंत्री म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी पुन्हा मंत्री गुलाबराव पाटील यांची वर्णी लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post