मुंबई : राज्यात गेल्या महिन्यापासून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. सर्व पक्षांनी आपल्या उमेदवारासाठी मैदानात उतरून जोरदार प्रचार केला. गेल्या महिनाभरापासून राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या रुपाने धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा आज थंडावतील.
आज संध्याकाळी ६ नंतर प्रचार थांबणार आहे. या नंतर कोणत्याही प्रकारची सभा, पैसे वाटप, मतदारांवर प्रभाव पाडले, जाहिराती, प्रसिद्ध करण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली असून कार्यक्रम, सार्वजनिक सभा, मिरवणुका देखील घेण्यास बंदी करण्यात आली आहे. असे कुणी करतांना आढळल्यास त्या पक्षावर किंवा उमेदवारावर गुन्हा दाखल होऊन त्याची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता आहे.
आता उमेदवारांना आणि मतदारांनाही २० नोव्हेंबर या मतदानाच्या दिवसाची प्रतीक्षा आहे. विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा १५ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने केली. त्यानंतर सर्व राजकीय पक्ष जागावाटप आणि उमेदवार निश्चितीत गुंतले. २२ ते २९ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती, तर ४ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.
त्यानंतर राज्यात खऱ्या अर्थाने प्रचाराची सुरुवात झाली आणि सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात उतरले. राज्यातील पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह भाजप आणि काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि इतर राज्यातील मुख्यमंत्री आणि मंत्रीही राज्यात प्रचाराला आले होते. मागील महिनाभरात प्रचार सभा आणि रोड शो यांनी राज्यातील निवडणूक रण ढवळून निघाले होते.















Discussion about this post