जळगाव I पारंपरिक शिक्षणात निरीक्षण आणि विश्लेषण क्षमता वृध्दींगत करण्याचा मुख्य उद्देश असला तरी त्यासोबतच नैतिक मूल्य देखील शिक्षणाव्दारे वाढविण्याची गरज असून त्यातूनच सुदृढ राष्ट्रनिर्मिती होईल असा विश्वास कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी व्यक्त केला.
विद्यापीठात आयोजित पश्चिम विभागीय राष्ट्रीय सेवा योजना पूर्व प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड शिबिराचे उद्घाटन करतांना प्रा.माहेश्वरी बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रासेयो प्रादेशिक संचालक अजय शिंदे उपस्थित होते. मंचावर प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.सुरेखा पालवे, प्रा. म.सु.पगारे, प्रा. अनिल डोंगरे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, युथ ऑफीसर सुमंतकुमार यादव, रा.से.यो. संचालक डॉ. सचिन नांद्रे उपस्थित होते.
प्रा.माहेश्वरी म्हणाले की, आम्ही शिक्षणातून केवळ मानवी रोबोट निर्माण करीत आहोत का. कारण सामाजिक संवेदना आणि नैतिक मूल्य कमी होतांना दिसत आहे. युवाशक्तीच्या उर्जेला योग्य दिशा देण्याची गरज आहे. पारंपरिक शिक्षणासोबतच आमची संस्कृती, परंपरा, मैत्री याबाबतीतील भावना व संवेदना वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी नैतिक मूल्य पेरावे लागतील. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामाबद्दल त्यांनी गौरव करतांना यातून राष्ट्रनिर्माण करण्यात रासेयोचा सहभाग मोठा असल्याचे सांगितले. या शिबीरातून विविध राज्यातील संस्कृती, भाषा, परंपरा, वेशभूषा यांची ओळख करुन घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
अजय शिंदे यांनी आपल्या भाषणात या शिबीरातून ४४ रासेयो स्वयंसेवकांची अंतिम निवड केली जाणार असून त्यामध्ये शारिरीक तंदुरुस्ती, परेड मधील कामगिरी, सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभाग व मूलाखत या निकषांव्दारे तज्ज्ञांकरवी ही निवड पारदर्शी पध्दतीने केली जाणार असल्याचे सांगितले.
प्रारंभी रासेयो संचालक डॉ.सचिन नांद्रे यांनी प्रास्ताविकात रासेयोच्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो जिल्हा समन्वयक डॉ.दिनेश पाटील यांनी केले. कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांनी आभार मानले.















Discussion about this post