जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्व. बाळासाहेब ठाकरे सेंटर ऑफ एक्सलेंस इन जर्नालिझम उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मंत्रीमंडळाच्या बैठकीत तत्वत: प्रशासकीय मान्यता दिली असून त्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे..
या संदर्भात दि. १४ ऑक्टोबर रोजी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक डॉ. सुधीर भटकर यांनी विद्यापीठात “स्व. बाळासाहेब ठाकरे सेंटर ऑफ एक्सलेंस इन जर्नालिझम” उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव दिला होता . त्या अनुषंगाने दि. १४ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हे सेंटर उभारण्यासाठी २५ कोटी रुपयांच्या कामांना तत्वत: प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
यामध्ये “स्व. बाळासाहेब ठाकरे सेंटर ऑफ एक्सलेंस इन जर्नालिझम” भवनाच्या बांधकामासाठी ८ कोटी, वसतिगृहाच्या बांधकामासाठी ७ कोटी, दृकश्राव्य केंद्र उपकरणे खरेदीसाठी ५ कोटी आणि या केंद्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यासाठी तसेच आवश्यक मनुष्यबळ पुरविण्यासाठी ५ कोटी अशा एकूण २५ कोटींच्या कामांना तत्वत: प्रशासकीय मान्यता दिली आहे.
राज्यशासनाने प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.सुधीर भटकर यांनी शासनाचे आभार मानले आहेत.















Discussion about this post