जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी पुन्हा डोकं वर काढताना दिसत आहे. जळगाव शहरातील रणछोड नगर परिसरात लाईट गेल्याचा फायदा घेत अज्ञात इसमाने महिलेच्या घरात घुसून तिची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुवर्णा राजेश नवाल (वय ५७, रा. गणेशवाडी, रणछोड नगर) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दाणा बाजारात धान्याचे व्यापारी असलेले राजेश नवाल हे पत्नीसह राहत होते. गुरुवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे दुकानावर निघून गेल्याने त्यांच्या पत्नी घरी एकट्याच होत्या. त्यांच्या शेजारी त्यांचे लहान भाऊ राहत असल्याने ते पत्नीसह मंदिरात गेले होते. दरम्यान, सायंकाळी ६ वाजता त्यांच्या घरात काम करणारी मोलकरीन काम करुन घरी निघून गेल्या. त्यानंतर कोणीतरी अज्ञात नवाल यांच्या घरात शिरुन त्यांच्या डोक्यात अवजड वस्तू टाकून त्यांचा खून केला. दरमयान, रात्री नऊ वाजेच्या सुमारास राजेश नवाल हे घरी आल्यानंतर त्यांना पत्नी घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांनी शेजारी राहणाऱ्या भावाला माहिती दिल्यानंतर त्यांनी परिसरातील डॉक्टरांना बोलावून घेतले. त्यांनी तपासणी करत महिलेला मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
गणेशवाडी परिसरात सायंकाळी सात वाजेपासून लाईट गेलेली असल्याने अंधार होता. त्यामध्ये महिला घरी एकट्याच असल्याची संधी साधत अज्ञातांनी नवाल यांच्या घरात शिरुन त्यांचा खून केल्याची चर्चा परिसरात सुरु होती. खून झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणता गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घरातील सामान देखील तसाच असून कुठलाही ऐवज चोरीला गेलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांकडून वेगवेगळ्या दिशेने तपास केला जात आहे.















Discussion about this post