जळगाव । पारोळा तालुक्यातील एका गावात विकास कामांसाठी मंजूर निधीची वर्क ऑर्डर काढण्यासाठी एक लाख रुपयाच्या लाचप्रकरणी पारोळाच्या ग्राम विस्तार अधिकाऱ्यासह सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याला जळगावच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली.
तक्रारदार हे सरपंच यांचा मुलगा असून त्यांच्या गावातील ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत काँक्रेट व पेव्हर ब्लॉक अशा एकूण चार कामांच्या प्रत्येकी १५ लाख रुपये प्रमाणे ६० लाखांचे काम शासनाकडून मंजूर होऊन आलेले होते. या कामाची वर्कऑर्डर काढण्यासाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कल्पेश ज्ञानेश्वर बेलदार (वय २८) यांनी ग्रामविस्तार अधिकारी सुनील अमृत पाटील (वय ५८) यांच्यासाठी २ टक्के प्रमाणे व स्वतःसाठी १ टक्के प्रमाणे १ लाख ८० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.
त्याबाबत तक्रारदारांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी केली असता ग्रामविस्तार अधिकारी सुनील पाटील यांनी प्रोत्साहन देऊन कल्पेश बेलदार यांनी पंचांसमक्ष तडजोडीअंती १ लाख रुपये बीडिओसाठी लाचेची मागणी करून १ लाख रुपये लाच स्वीकारताना त्यांना शुक्रवार दि. २० सप्टेंबर रोजी रंगेहात पकडण्यात आले आहे.















Discussion about this post