धुळे । काल दहा दिवसाच्या लाडक्या गणरायाला मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला. मात्र गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान धुळ्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरखाली आल्याने तीन बालके जागीच ठार झाल्याची घटना धुळे शहरापासून जवळ असलेल्या चितोड गावात घडलीय.
परी बागुल, शेरा सोनवणे, लड्डू पवार अशी मृत मुलांची नावे आहेत. तर या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर भाऊसाहेब हिरे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एकाची स्थिती गंभीर आहे. त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून घटना नेमकं कशी घडली, याचा तपासही सुरू करण्यात आला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गाव शोकाकुल झाले आहे. ट्रॅक्टरवर चढून ड्रायव्हरने तो सुरू केला, मात्र या ट्रॅक्टरच्या आजुबाजूला असलेल्या तीन चिमुकल्या मुलींच्या अंगावरुन हा ट्रॅक्टर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. उभ्या असलेल्या ट्रॅक्टरजवळ या मुली खेळत असताना हा भीषण अपघात घडला आहे. या घटनेमध्ये एक महिला देखील गंभीरित्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच इतर पाच ते सहा जणांचा देखील दुखापत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे, हा अपघात नेमका कसा झाला, गाडीच्या ड्रायव्हरच्या लक्षात कसे आले नाही, याचा तपास सध्या सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनी चितोड गावात धाव घेत पाहणी सुरू केली तसेच ट्रॅक्टर देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यासोबतच ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये एक मुलगी 4 वर्षांची,एक 7 आणि एक 14 वर्षांची, अशा तीन मुली असून एक महिला देखील गंभीररित्या जखमी झाली आहे.















Discussion about this post