मुंबई । यंदा महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात मान्सून पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे धरणांमध्ये चांगला जलसाठा निर्माण झाला. यामुळे केवळ पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपला नाही तर यंदा शेतीलाही मुबलक पाणी मिळणार आहे. यातच आता मान्सून आपला परतीचा प्रवास सुरु करणार आहे. त्यासंदर्भातील माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.
या तारखेपासून मान्सून परतीचा प्रवास?
मान्सून १९ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत परतीचा प्रवास सुरु करण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने सांगितले आहे. यंदा केरळमध्ये वेळेआधी मान्सून दाखल झाला. सर्वसाधारणपणे मान्सून १ जूनला केरळमध्ये पोहोचतो आणि ८ जुलैपर्यंत संपूर्ण देशात पसरतो. त्यानंतर त्याचा परतीचा प्रवास १७ सप्टेंबरच्या आसपास सुरू होतो आणि १५ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशातून माघारी फिरतो.
हवामान विभागाने सांगितले की, वायव्य भारताच्या काही भागांमधून नैऋत्य मोसमी वारे परत फिरण्यासाठी पुढील आठवड्यात अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे. यामुळे १९ ते २५ सप्टेंबर दरम्यान मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार आहे. सध्या सक्रिय असलेल्या ला-निनाच्या प्रभावामुळे सप्टेंबरमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली गेली. हा पाऊस ऑक्टोंबरमध्येही लांबणार असल्याचे भाकीत व्यक्त केले होते. परंतु हवामान विभागाने ही शक्यता फेटाळली आहे.















Discussion about this post