चाळीसगाव । गेल्या तीन चार दिवसात जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. यामुळे पिकांची परिस्थिती खराब झाली आहे. दरम्यान शेतातील पिकांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांसोबत दुर्दैवी घटना घडली. शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव तालुक्यात घडली.
चाळीसगाव तालुक्यातील वाघडू येथील शेतकरी साहेबराव भीमराव पाटील (वय ४८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. साहेबराव पाटील हे शेतात पिकांची पाहणी करण्यासाठी गेले होते. शेतात फेरफटका मारत असतात ते शेतातील विहिरीजवळ गेले होते. यावेळी शेतातील विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. यावेळी शेतात कोणीच नसल्याचे त्यांना मदत मिळाली नाही.
शेतात गेलेले वडील अजून घरी आले नाही. म्हणून साहेबराव पाटील यांचा मुलगा त्यांना पाहण्यास गेला असता हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेत साहेबराव पाटील यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात नेला. याप्रकरणी बबनराव बाजीराव पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.















Discussion about this post