अकोला : धावत्या शिवशाही बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना खामगाव ते अकोला मार्गावर रिधोराजवळ घडली. यात बस पूर्णतः जळून खाक झाली. मात्र चालकाने प्रसंगावधान राखल्याने सर्व ४४ प्रवासी सुखरूप बाहेर निघाले.
शेगाव बसस्थानकावरून अकोला आगाराची एमएच ०९ ईएम १७९२ ही शेगाव-अकोला नॉनस्टॉप शिवशाही बस अकोला जाण्यासाठी प्रवाशी घेऊन रवाना झाली. नॉनस्टॉप गाडी असल्याने गाडीत वाहक नव्हता. बाळापूर मार्गे अकोलाच्या दिशेने निघालेल्या बसने रिधोरा गाव ओलांडताच अचानक पेट घेतला. रिधोरा परिसरातील अशोक लेलँड वर्कशॉप जवळ बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याची बाब चालक पुरुषोत्तम डोंगरे यांच्या लक्षात आली.
चालकाने बस थांबवून सर्व ४४ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. प्रवाशी बसच्या खाली उतरताच आगीने बसला कवेत घेतले. बघता बघता संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. चालकाने आग विझवण्यासाठी बसमधील सिलिंडरचा वापर केला. मात्र आग आटोक्यात आली नाही. घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. मात्र बंब येईपर्यंत २० मिनिटात बस खाक झाली हाेती. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.















Discussion about this post