नवी दिल्ली । नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसला पक्षातील सहा ते सात आमदारांकडून क्रॉस वोटिंग करण्यात आले असून यामुळे महाविकास आघाडीकडून निवडणूक मैदानात असलेले शेकाप नेते जयंत पाटील यांच्या पदरी पराभव पडला.
त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर त्वरित कठोर कारवाई केली जाईल, असा दावा केला होता. मात्र आता काँग्रेसने भूमिका बदलत आमदारांचं लगेच निलंबन न करता विधानसभा निवडणुकीत सदर आमदारांना दणका देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. विशेष क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांमध्ये रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांच्या नावाची चर्चा देखील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांचं ताबोडतोब निलंबन न करता आगामी विधानसभा निवडणुकीत सदर आमदारांचं तिकीट पक्षाकडून कापलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांचा पत्ता कट होऊन त्यांच्या जागी पक्षाकडून नवे उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ज्या आमदारांवर काँग्रेसकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे, असे आमदार महायुतीतील पक्षांचा पर्याय निवडण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी आज काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले नेते आणि राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे.















Discussion about this post