मुंबई । उद्या म्हणजेच १२ जुलै रोजी विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान पार पडणार असून याच पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदारांची विधीमंडळात महत्वाची मिटिंग पार पडली. यावेळी उद्या होणाऱ्या या मतदानात फोडाफोडी, फुटाफूट टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सावध पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. या बैठकीमध्ये उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या अनुशंगाने महत्वाच्या सूचना देण्यात आल्या.
भाजपच्या 5 उमेदवारांना कोणत्या आमदारांनी कोणत्या पसंतीचं मते द्यावीत? मतदान कसे करावे? याबाबतच्या सूचना करण्यात आल्या. यावेळी आमदारांची कोऱ्या कागदावर मतदान करुन रंगीत तालीमही घेण्यात आली. मत वाया जाणार नाही, बाद होणार नाही, यासाठी काळजी घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
दरम्यान, विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. महाविकास आघाडीने १ उमेदवार जास्त दिल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे. महायुतीकडे ९ उमेदवार निवडून येण्याइतके संख्याबळ आहे. मात्र महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार निवडून येणे संख्याबळाच्या दृष्टीने कठीण आहे. केवळ क्रॉस वोटिंग झाले तरच महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार निवडून येणार आहे.















Discussion about this post