मुंबई । ॲड. उज्ज्वल निकम यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवली. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून त्यांनी ही निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. यानंतर राज्य सरकारने उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून पुनर्नियुक्ती केली. या पुनर्नियुक्तीला काँग्रेसकडून विरोध करण्यात आला. यातच आता महाराष्ट्रातील अनेक हत्या प्रकरणातील आरोपी आणि गँगस्टर विजय पालांडे यानेदेखील निकम यांच्या पुनर्नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी आरोपी पालांडेने मुंबई हायकोर्टाकडे केली आहे.
विजय पालांडेने ही नियुक्ती रद्द करण्यासाठी एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे पालांडेने निकम यांच्या पुनर्नियुक्तीला आव्हान दिलं आहे. उज्ज्वल निकम यांची वाईट हेतूने पुनर्नियुक्ती करण्यात आल्याचे या याचिकेत सांगण्यात आले आहे. ॲड. उज्ज्वल निकम यांनी भाजपच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांची ओळख, अजेंडा, हेतू आणि विचार बदललेले आहेत.
उज्ज्वल निकम यांनी मुंबई बॉम्बस्फोटासारख्या अनेक हाय प्रोफाईल केसेसमध्ये सरकारी वकील म्हणून काम करुन सरकारची बाजू मांडली आहे. पालांडेच्या खटल्यात पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावर पालांडेने आक्षेप घेतला आहे. कोर्टात यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. याचिकेत त्याने म्हटलंय की, ते (उज्ज्वल निकम आता राजकीय पक्षाच्या अजेंड्यानुसार काम करतील. लोकांसमोर भाजपची प्रतिमा चांगली राहावी यासाठी ते प्रयत्न करतील. त्यासाठी ते हाय-प्रोफाईल प्रकरणांमध्ये आरोपींना खोटी शिक्षा मिळावी म्हणून कोणत्याही पातळीला जाण्याची शक्यता आहे. हे आरोपीच्या नैतिक अधिकाराच्या विरोधात आहे.
28 जूनला होणार या प्रकरणाची सुनावणी
पालांडेने निकम यांची नियुक्ती रद्द करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्याचा आग्रह केला आहे. या प्रकरणाची सुनावणी 28 जूनला होणार आहे. दिल्लीतील व्यावसायिक अरुण टिक्कू आणि चित्रपट निर्माता करणकुणार कक्कडच्या हत्येच्या आरोपाखाली पालांडेला अटक करण्यात आली. तो एप्रिल 2012 पासून न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.















Discussion about this post