जळगाव । मोदी मंत्रिमंडळात नुकत्याच केंद्रीय राज्यमंत्री झालेल्या रक्षा खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील दोन मोठे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं होते. यांनतर आता खडसे-महाजन या दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याची गरज राज्याचे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी व्यक्त केली.
विशेषतः त्यांनी या दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्यात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वासही व्यक्त केला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, राजकारणातील विरोधक केव्हाही एकमेकांचे कायमस्वरुपी विरोधक नसतात. आज मित्र असणारे उद्या विरोधक होतात आणि विरोधक असणारे मित्र होतात. राज्याच्या राजकारणात कधीकाळी भाजप नेते गिरीश महाजन व एकनाथ खडसे एकमेकांचे चांगले मित्र होते. पण नंतर त्यांच्यातील वाद विकोपाला गेला.
एकमेकांवर टीका करताना हे दोन्ही नेते अगदी खालची पातळी गाठतात. आता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून पुन्हा भाजपत येणार आहेत. पण त्यांचा प्रवेश सोहळा अनेक महिन्यांपासून थांबला आहे. हे दोन्ही नेते लवकरच एकत्र येतील, तथापि त्यांना एकत्र आणण्याची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे पार पाडतील, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील नेते त्यांच्या भागाच्या विकासासाठी एकजूट होतात. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनीही आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी गरज असेल तेव्हा एकत्र यावे. ही माझीच नाही तर जनतेचीही अपेक्षा आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
ते पुढे बोलताना म्हणाले की, एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांनी आता एकत्र यावे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या दोघांना एकत्र आणणार आहेत. ही चांगली गोष्ट आहे. असे घडले तर त्याला आमच्याही सदिच्छा आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी केवळ हे दोन नेतेच नाही, तर इतर पक्षांतील नेत्यांनीही एकत्र येण्याची गरज आहे, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.















Discussion about this post