महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून लोकांना कडाक्याच्या उकाड्याचा सामना करावा लागला आहे. मात्र आता या उकाड्यापासून नागरिकांची सुटका होणार आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचे आगमन झाले असून राज्यात पुढील पाच दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
गोवा किनारपट्टीवरील अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढील ५ ते ६ दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबईसह पुण्याला रविवारपासून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे
हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाला पावसाचा इशारा देण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुबार, या जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, हिंगोली आणि परभणीतही पावसाचा अंदाज आहे.
विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागरपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. सध्या राज्यभरात पाऊस कोसळत असला तरी, हा पेरणीयोग्य पाऊस नाही. त्यामुळे जमिनीत ६ इंच ओलावा जाईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घेऊ नये, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.















Discussion about this post