भुसावळ । भुसावळ शहरात बुधवारी रात्री अंदाधुंद गोळीबार करत दोघांचा खून करण्यात आला असून आता या दुहेरी हत्याकांड प्रकरणी 8 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतलं आहे. या 8 संशयितांपैकी एका संशयितास भुसावळमधून तर गुजरातमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुसऱ्या संशयीतास धुळे जिल्ह्यातील साक्री येथून पोलिसांनी ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. राजू सूर्यवंशी आणि विनोद चावरिया असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे याचा तपास पोलिस करत आहेत.
भुसावळ शहरात जुना सातारा रोडवरून माजी नगरसेवक संतोष बारसे हे कारमधून जात असताना मरिमाता मंदिर परिसरजवळ कार येताच दबा धरून बसलेल्या दोघांनी त्यांचेवर अंदाधुंद गोळीबार केल्यानं ते कारमध्येच जागेवर कोसळले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना तातडीनं जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्या दोघांना मृत घोषित केलं होतं.
घटनेचं गांभीर्य पाहता पोलिसांनी तातडीनं संपूर्ण भुसावळ शहरात नाकाबंदी करत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी कुणाचा हात आहे याचा तपास भुसावळ पोलिस करत आहेत. पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.















Discussion about this post