नाशिक । लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्वच पक्षांनी उमेदवार जाहीर केले. मात्र यादरम्यान अनेक नाराजीनाट्याचे प्रकार समोर आले आहे. आता नाशिकमध्ये महायुतीला बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे.
भाजप नेते अनिल जाधव यांनी बंडखोरी केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते निवृत्ती अरींगळे यांनी देखील बंडखोरीचं हत्यार उपसलं आहे. नाशिक लोकसभेच्या जागेसाठी अरींगळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.
माझ्या उमेदवारीबाबत मी अजित पवार यांना कल्पना दिली आहे, असं अरींगळे यांनी सांगितलं आहे. महायुतीतील दोन महत्वाच्या नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे. हे दोन्ही उमेदवार निवडणुकीत हेमंत पाटील यांचा खेळ बिघडवणार का? अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान, हेमंत गोडसे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. सध्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून राजाभाऊ यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. दुसरीकडे महायुतीतील पदाधिकारी बंड करत असल्याने शिंदे गटाचं चांगलंच टेन्शन वाढलं आहे.















Discussion about this post