जळगाव । लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये म्हणून जिल्हा दंडाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांनी आचार संहिता लागू झाल्यापासूनच्या पंचवीस दिवसात जिल्ह्यातील तब्बल ५ हजार ८० सराईत गुन्हेगार, गुन्हेगारांच्या टोळ्या, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यामध्ये चॅप्टर केसेस, नोटीस देऊन समाज, हडपारीसह एमपीडीए कारवाईचा समावेश असल्याची माहिती जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी १६ मार्च रोजी आचार संहिता लागू तत्पूर्वीच जिल्हादंडाधिकाऱ्यांनी सर्व उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. लोकसभा निवडणूक शांततेच्या वातावरणात व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाय योजनांवर भर देण्यात येत आहे. निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सुरक्षाविषयक उपयोजनांबाबत विभागांतर्गत माहितीचे आदान प्रदान करण्यात आले.
जमा केलेली शस्त्रे, मागील सार्वत्रिक निवडणुकीत दाखल झालेले गुन्हे, निवडणूक विषयक गुन्हे दाखल झालेल्या व्यक्ती, सराईत गुन्हेगार आदींची माहिती जमा करण्यात आली होती त्या माहितीचे विश्लेषण करुन गुन्ह्यांची पुनरावृत्ती होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अतिसंवेदनशील व संवेदनशील मतदान केंद्रातील नागरिकांना शांततेत आणि निर्भयपणे मतदान करता यावे यासाठीही प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात आलेले आहेत. . पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार, गुनोगारांच्या टोळ्या, चोर तसेच मागील सार्वत्रिक निवडणुकीत गुन्हे दाखल असलेल्यांवरही प्रतिबंधात्मक कारवाई केली. गुन्हे रोखण्यासाठी नोटीस देऊन समजही देण्यात आली आहे.















Discussion about this post