आर्थिक वर्ष 2023-24 मधील शेवटचा महिना अर्थात मार्च संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत. 1 एप्रिल 2024 पासून नवीन आर्थिक वर्ष 2024-25 सुरू होणार आहे. मात्र, त्या पूर्वीच तुम्हाला काही आर्थिकबाबीं संदर्भात असणारी कामं पूर्ण करून घेणं फायद्याचं ठरेल. अन्यथा तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. ही कामं पूर्ण करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? या संबंधी नियम काय आहेत? ते जाणून घेऊ
जीएसटी कंपोझिशन स्कीम
आर्थिक वर्ष 2024-25 साठी विद्यमान जीएसटी करदाते कंपोझिशन स्कीमसाठी 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. एक निश्चित उलाढाल असणारे पात्र व्यावसायिक करदाते या योजनेसाठी अर्ज करू शकतात. ही एक सोपी कर योजना आहे. यासाठी करदात्यांना केवळ सीएमपी-02 फॉर्म भरावा लागेल. ज्यांची वार्षिक उलाढाल 1.5 कोटी रुपये आहे, असे जीएसटी करदाते या स्कीम अंतर्गत अर्ज करू शकतात. तर, काही विशिष्ट श्रेणींअंतर्गत ही मर्यादा 75 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. रेस्टॉरंटसाठी वार्षिक उलाढाल 1.5 कोटी रुपये आहे, तर इतर सेवा पुरवठादारांसाठी ती 50 लाख रुपये आहे.
या योजनांमध्ये करा किमान गुंतवणूक
जर तुम्ही पीपीएफमध्ये आणि सुकन्या समृद्धीसह इतर सरकारी स्कीममध्ये गुंतवणूक केली असेल, तर तुमच्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात त्या संबंधित अकाउंटवर किमान रक्कम जमा करणं अनिवार्य आहे. तुम्हाला पीपीएफमध्ये वर्षभरात किमान 500 रुपये आणि सुकन्या समृद्धी योजनेत 250 रुपयांपर्यंत गुंतवणूक करणं आवश्यक आहे. तुम्ही असं न केल्यास, तुमचं अकाउंट डीफॉल्ट घोषित केलं जाऊ शकतं व तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
कर वाचवण्यासाठी अशी करा गुंतवणूक
आयकर रिटर्न भरण्याचा कालावधीही एप्रिल महिन्यापासून सुरू होत आहे. तुम्ही 2023-24 या आर्थिक वर्षासाठी जुन्या कर योजनेत रिटर्न भरत असाल तर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ घेऊ शकता. तसंच या पूर्वी कर बचतीच्या योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक केली नसेल, तर तुम्ही 31 मार्चपूर्वी त्यामध्ये गुंतवणूक करून आयकर वाचवू शकता. आयकर वाचवण्यासाठी कलम 80 सी अंतर्गत तुमच्याकडे अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये पीपीएफ, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम, सुकन्या समृद्धी, मुदत ठेव, एनपीएस आणि पोस्ट ऑफिस बचत स्कीमचा समावेश आहे.
फास्टॅग केवायसी अपडेट करा
फास्टॅग युजर्ससाठी 31 मार्च 2024 ही तारीख खूप महत्त्वाची आहे. कारण नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने फास्टॅग केवायसी अपडेट करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2024 पर्यंत वाढवली आहे. या पूर्वी ही मुदत 29 फेब्रुवारी होती. तुमच्या फास्टॅग सेवा देणाऱ्या कंपनीनुसार तुम्ही नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शनच्या वेबसाईटवर किंवा इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या पोर्टलवर जाऊन तुमच्या फास्टॅगचा केवायसी तपशील अपडेट करू शकता. असं न केल्यास तुमचं फास्टॅग अकाउंट 1 एप्रिल 2024 पासून बंद होईल.
चलन स्टेटमेंट फाइल करा
प्राप्तिकरदात्यांना जानेवारी 2024 साठी वेगवेगळ्या कलमांतर्गत मिळणाऱ्या कर सवलतीसाठी टीडीएस फायलिंग सर्टिफिकेट दाखवावे लागेल. कलम 194-आयएम, 194-आयबी आणि 194एम अंतर्गत कर कपात केली असल्यास 30 मार्चपूर्वी चलन स्टेटमेंट फाइल करावं लागेल.
दरम्यान, आर्थिक वर्ष 2023-24 संपण्यापूर्वीच तुम्ही तुमची आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची कामं लवकरात लवकर करणं गरजेचं असून, त्या दृष्टिने नियोजन करणं आवश्यक आहे.















Discussion about this post