मुंबई । देशासह राज्यावर असलेलं अवकाळी पावसाचं सावट अद्यापही कायम आहे. गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यातच शेतकर्यांची चिंता वाढवणारी आणखी एक बातमी आहे. येत्या ४८ तासांत राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यासह संपूर्ण देशातील हवामानात मोठे बदल झाले आहेत. पर्वतीय भागात हिमवृष्टी होत असल्याने उत्तरेकडून थंडगार वारे राज्याच्या दिशेनं कूच करीत आहेत. परिणामी मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झालंय. यात राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणीसह अन्य जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. दुसरीकडे मुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा दाह वाढला आहे. रविवारी संध्याकाळनंतर वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा झंझावात सक्रीय असल्याने त्याचा थेट परिणाम मुंबईसह पुणे शहरातील वातावरणावर दिसत आहे. मंगळवारी (५ मार्च) मुंबईसह उपनगरातील वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. अचानक वाढलेल्या उकाड्यामुळं त्रासलेल्या मुंबईकरांना या अनपेक्षित थंडीमुळं काहीसा दिलासा मिळणार आहे.
देशातील हवामानाबाबत बोलायचं झाल्यास वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे राजधानी दिल्लीसह पूर्व मध्य प्रदेश, उत्तर तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पुढील एक-दोन दिवसांत हलका पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालयच्या काही भागातही पावसाची शक्यता आहे.















Discussion about this post