जळगाव। ऑइल गळती होत असल्याचे कारण सांगून दुचाकीस्वाराने व्यावसायिकाच्या कारच्या सीटवर ठेवलेली दीड लाखांची रोकड व कागदपत्रांची पिशवी लांबवून पोबारा केल्याची घटना वर्दळ असलेल्या महापालिकेच्या समोरील रस्त्यावर घडली. याप्रकरणी रात्री जळगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपाळ काशीनाथ पलोड (वय ६७, रा. हरेश्वरनगर) हे वृद्ध आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचे दाणाबाजार परिसरात दुकान असून, व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरुवारी सायंकाळी ७ वाजता दुकान बंद करून गोपाळ पलोड हे कारने घरी जाण्यासाठी निघाले. महात्मा गांधी रोडवरून जात असताना एका दुचाकीवरून आलेले २० ते २५ वयोगट असलेले दोन जण अचानक समोर आले. त्यांनी गोपाळ पलोड यांना कारमधून ऑइल खाली गळत असल्याचे सांगितले
पलोड व यांचे लक्ष विचलित करून कारमध्ये ठेवलेली १ लाख ५० हजार रुपयांची रोकडची बॅग दोघांनी लांबविली. काही कळण्याच्या आत दोघे जण दुचाकीवरून पसार झाले. घटना घडल्यानंतर पलोड यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात रात्री अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ भास्कर ठाकरे करीत आहेत















Discussion about this post