जळगाव | महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ या वर्षासाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज मागविण्यात आले आहेत.
या योजनेंतर्गत पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी QS (Quacquarelli Symonds) रँकिंगमध्ये २०० च्या आत असलेल्या परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या अथवा घेऊ इच्छिणाऱ्या एकूण ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
शिष्यवृत्तीसाठी शाखानिहाय व अभ्यासक्रमनिहाय जागा उपलब्ध असून पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. शिष्यवृत्तीचे स्वरूप, पात्रता अटी व अर्जाचा नमुना याबाबतची सविस्तर माहिती विभागाच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. परदेशी शिष्यवृती अर्जाचा नमुना, शासन निर्णय, शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचा अन्य महत्वाच्या अटी शर्ती इ. सविस्तर माहीतीसाठी विभागाच्या https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in व https://www.dirobbwd.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
इच्छुक विद्यार्थ्यांनी https://fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. तसेच अर्जाची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांसह स्वहस्ताक्षरीत प्रती २१ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे येथे सादर कराव्यात. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही.
अधिक माहितीसाठी इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी विशाल पी. राठोड यांनी केले आहे.















Discussion about this post