राज्यात अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत असून अशातच रात्रभर कष्टाचे काम करून विटांनी भरलेल्या ट्रकने घराकडे निघालेल्या मजुरांवर काळाने भीषण झडप घातली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ईसापूरजवळ विटांनी भरलेला आयशर ट्रक पहाटेच्या सुमारास उलटल्याची दुर्दैवी घटना घडली. या भीषण अपघातात विटांखाली दबून ३ मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य ३ मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
विशेष म्हणजे, अपघात झाल्यानंतर जखमींना मदत करण्याऐवजी चालक आणि मालक घटनास्थळावरून फरार झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खापा येथून मोवाडच्या दिशेने विटांनी भरलेला आयशर ट्रक जात होता. रात्रभर विटा भरण्याचे कष्टाचे काम केल्यामुळे ट्रकच्या केबिनमध्ये ६ मजूर गाढ झोपेत होते. पहाटेच्या सुमारास सावनेर मार्गावरील ईसापूर गावाजवळ चालकाचे भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याखाली जाऊन उलटला.
ट्रक उलटताच केबिनमधील मजूर विटांच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले. हा अपघात इतका भीषण होता की, यात तिघांचा जागीच जीव गेला. त्यात संजय कनेरे, लीलाधर वालूलकर आणि अजित भलावी अशी मृतांची नावे आहेत. तर राजेंद्र राजगुरू, हेमराज कन्हेरे आणि सुभाष धुर्वे अशी जखमींची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विटांच्या ढिगाऱ्याखालून मजुरांना बाहेर काढण्यात आले.
भीषण अपघातानंतर चालक-मालक घटनास्थळावरून फरार झाले आहेत. जखमींना वाऱ्यावर सोडून चालकाने पळ काढल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी प्रवीण उर्फ गोलू बले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काटोल पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. बीएनएस आणि मोटार वाहन कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आली आहेत.















Discussion about this post