यावल | जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या हरिपुरा धरणात बुडून १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जयेश संजय फेगडे (वय १७) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयेश हा आपल्या चुलत भावासह आणि वहिनीसोबत सातपुडा पर्वतरांगांतील हरिपुरा धरण परिसरात फिरण्यासाठी गेला होता. पावसाळ्यामुळे धरण परिसरातील निसर्गसौंदर्य खुलून आल्याने या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. जयेश आणि त्याचे नातेवाईकही याच उद्देशाने तेथे गेले होते.
दरम्यान, धरण परिसरात फिरत असताना जयेशला पाण्यात पोहण्याचा मोह आवरला नाही. त्याने धरणाच्या पाण्यात उतरून पोहण्यास सुरुवात केली. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला. हे पाहताच त्याच्या नातेवाईकांनी आरडाओरड करत मदतीसाठी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि उपस्थित पर्यटकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रयत्नांनंतर जयेशला पाण्याबाहेर काढण्यात आले. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
यानंतर जयेशचा मृतदेह पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे फेगडे कुटुंबावर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात धरणे, तलाव आणि नद्यांमध्ये पाण्याची पातळी तसेच प्रवाह वाढलेला असतो. त्यामुळे अशा ठिकाणी पोहण्याचा किंवा पाण्यात उतरण्याचा मोह टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.















Discussion about this post