जळगाव : शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येने आता भीषण रूप धारण केले असून आणखी एका निष्पाप नागरिकाचा जीव गेला आहे. पिंप्राळा-हुडको परिसरातील ३० वर्षीय तरुणाचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
मृत तरुणाचे नाव शेख ताहेर शेख फारुख असे असून तो हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. सुमारे महिनाभरापूर्वी परिसरातील एका पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने त्याच्यासह अनेक नागरिकांवर अचानक हल्ला चढवला होता. या हल्ल्यात ताहेर गंभीर जखमी झाला होता. त्याच्या हाताला खोल जखमा झाल्या होत्या.
घटनेनंतर त्याने जिल्हा रुग्णालयात उपचार घेत अँटी-रेबीज लस घेतली होती. मात्र डॉक्टरांनी सुचवलेले रेबीज प्रतिबंधक विशेष सिरम वेळेत न घेतल्याने परिस्थिती गंभीर बनल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांनी त्याची प्रकृती अचानक बिघडली आणि त्याच्यात रेबीजची लक्षणे दिसून आली. उपचारासाठी दाखल केल्यानंतरही त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, भुसावळातील घटनेनंतर काहीच दिवसांत जळगाव जिल्ह्यात रेबीजमुळे झालेला हा दुसरा मृत्यू असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड चिंता व्यक्त होत आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना महापालिकेने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
या घटनेनंतर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी महापालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, नसबंदी मोहीम आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी पुढे येत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्ग भयभीत झाला आहे. प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.














Discussion about this post